मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याने जरांगे पाटील खवळले , निषेधार्थ आजपासून पाणी आणि औषधोपचारही बंद करण्याचा मोठा निर्णय

Foto
जालना : मुंबईतील आझाद मैदानात उपोषणासाठी मागितलेली परवानगी पोलिसांनी नाकारल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाले आहेत. आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत, पण सरकारने कायदा पायदळी तुडवला आहे. आम्ही सरकारच्या अशा द्व्ोषपूर्ण नियमांशी बांधील नाही, अशा थेट शब्दांत जरांगे पाटलांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर प्रहार केला आहे. या नकाराच्या निषेधार्थ त्यांनी आजपासून पाणी आणि औषधोपचारही बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

जरांगे पाटील यांनी १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली होती. मात्र, मुंबई पोलिसांच्या आझाद मैदान पोलीस ठाण्याने या आंदोलनाला स्पष्ट परवानगी नाकारली आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे यांनी १५ सप्टेंबरपासून मुंबई चलो आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर, काल शनिवारी दुपारी जरांगे पाटील यांच्या प्रतिनिधींनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावे आझाद मैदान पोलिसांकडे आंदोलनाच्या परवानगीचा अर्ज सुपूर्द केला होता. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या कारणास्तव पोलिसांनी ही परवानगी नाकारल्याचे समजते. मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्यावतीने आलेल्या अर्जावर आपले उत्तर देताना परवानगी नाकारत असल्याचे म्हटले.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले, ङ्गङ्घगेल्या वर्षीही गणेशोत्सव होता आणि आम्ही शांततेत आंदोलन केले होते. न्यायालय जिथे आंदोलनाची परवानगी देते, तिथे पोलीस मात्र द्व्ोषभावनेने वागत आहेत. राज्य सरकार सोयीनुसार कायदा चालवत असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्य अस्थिर करण्याचे काम करत आहेत. ही हुकूमशाही आणि गुंडगिरी असून आपण सरकारसमोर कधीही शरण येणार नाही किंवा गुडघे टेकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

पोलिसांच्या या निर्णयाविरोधात जरांगे पाटलांचे वकील आता कायदेशीर पावले उचलणार आहेत. पोलीस आयुक्तांकडे दाद मागायची की न्यायालयात धाव घ्यायची, याचा निर्णय कायदेतज्ज्ञ घेतील. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करूनच आंदोलन करू, असे सांगत जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. जरांगे पाटलांनी पाणी व औषधोपचार सोडण्याचा निर्णय घेतल्याने उपोषण आंदोलन चिघळण्याची भीती आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही असलेले मनोज जरांगे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला (भाजपा) मराठा समाजाच्या मतांशिवाय निवडणुका जिंकून दाखवण्याचे थेट आव्हान दिले आहे. चंद्रकांत बावनकुळे यांना लक्ष्य करत, जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर मराठा समाजाविरुद्ध जातीवाद करत असल्याचा आणि आंदोलनकर्त्यांना त्रास देत असल्याचा आरोप केला.

जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, जर त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या तर ते शिवराळ भाषेचा वापर मागे घेण्यास तयार आहेत. यामध्ये ८८ लाख कुणबी नोंदी, हैदराबाद गॅझेटची अंमलबजाणी, ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी अंतर्गत नोकर्‍या, ओबीसी सवलती, सारथी योजनांना निधी आणि एमपीएससी उमेदवारांसाठी वयोमर्यादा वाढवणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. याचबरोबर, १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. उपोषणासाठी प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्यास, कायदेशीर मार्गाने लढा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, सरकार जाणीवपूर्वक परवानगी देण्यास विलंब करत आहे. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत शांततेत आणि कायदेशीर मार्गाने लढा सुरूच राहील, असे जरांगे पाटील यांनी ठामपणे नमूद केले.